Thursday, 29 March 2018

इंग्रजी सुधारण्यासाठी खास टिप्स..


इंग्रजी सुधारण्यासाठी खास टिप्स..
श्री. बाळासाहेब रघुनाथ चव्हाण . (सहशिक्षक)
के. एल. पोंदा हायस्कूल, डहाणू. जिल्हा- पालघर
संपर्क क्रमांक:- ७३८७३०७६०९
जगातील सुमारे ३५ कोटी लोकांची इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणजेच मातॄभाषा आहे तर १५ कोटी लोकांची द्वितीय भाषा. आज जगभरात सुमारे १०० कोटी लोक इंग्रजी भाषेत श्रवण,वाचन, सवांद आणि लेखन करतात. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणार्‍या व समजल्या जाणार्‍या भाषांत इंग्रजी भाषेची गणना होते. जगात दिवसेंदिवस इंग्रजीचे महत्व वाढत चालले आहे. आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा अफाट स्रोत जगासमोर उपलब्ध आहे पण त्यातील जास्तीतजास्त माहिती इंग्रजी भाषेत आहे. अशावेळी  इंग्रजीचे जागतिक महत्त्व कोणीही  नाकारू शकत नाही.
आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायच असेल, युगाबरोबर चालायचं असेल, काळाशी सुसंगत राहायचं असेल तर इंग्रजी भाषा आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. हीच काळाची गरज ओळखून  महाराष्ट्र शासनाने पहिलीपासून मराठी किंवा इतर माध्यमांच्या शाळांमधून इंग्रजी भाषा शिकवणे अनिवार्य केले . आज मोठी शहरे सोडली तर ग्रामीण आणि दुर्गम भागात इंग्रजीची अनामिक भीती विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात घर करून  बसली आहे.त्यांच्या मनात इंग्रजी बद्दल न्यूनगंड निर्माण झाला आहे. आपल्याला इंग्रजी जमणारच नाही असा गैरसमज निर्माण झाला आहे.इंग्रजी खूप अवघड आहे असा त्यांचा समाज आहे.
    आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान प्रत्येकाला असणे अत्यंत अगत्याचे आहे. पण पालक आणि विद्यार्थी यांच्या मनामध्ये इंग्रजी विषयाबद्दल कमालीची उदासीनता आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय खूप अवघड वाटतो परिणामी इंग्रजी विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. इंग्रजी विषयाबद्दल मनात एक अनामिक भीती आहे. ही भीती दूर करण्यासाठी अविरत सातत्यपूर्ण प्रयत्नाची गरज आहे. आपण आपल्या परीने अनेक प्रयत्न करत असतो.विविध उपक्रम राबवत असतो. विद्यार्थ्यांचा वयोगट , कल , आवड आणि क्षमता लक्षात घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवून आणि प्रयोग करून आपण आपले  इंग्रजी सुधारू शकतो. इंग्रजी सुधारण्यासाठी  विद्यार्थ्यांसाठी खालील  टिप्स नक्की फायदेशीर ठरू शकतात.
·       पाठ्यपुस्तकाचे मोठ्याने वाचन -
तुम्ही ज्या इयत्तेत असाल त्या  इयत्तेचे इंग्रजी विषयाचे पाठ्यपुस्तक घ्या. त्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धडा आणि कविता यांचे मोठ्या आवाजात वाचन करा. एखाद्या शब्द वाचता येत नसल्यास किंवा नेमका उच्चार माहित नसल्यास त्या शब्दाखाली उच्चार लिहून ठेवा. अशा शब्दांची वेगळी यादी करा व ती यादी वारंवार वाचा. म्हणजे पुन्हा वाचताना अडचण येणार नाही.
·       इंग्रजी वाचनाचा वेग-
इंग्रजी वाचनाचा वेगही महत्त्वाचा घटक आहे. अनेक वेळा इंग्रजी वाचताना  आपल्याला मराठी वाचनापेक्षा जास्त वेळ लागतो. याचे प्रमुख कारण सराव कमी  हे आहे. म्हणूनच इंग्रजी वाचनाचा वेग वाढविण्यासाठी वाचनाचा सराव करणे महत्वाचे आहे. यासाठी  सुरुवातीला सोप्या इंग्रजीमध्ये उपलब्ध असलेली छोटी छोटी पुस्तके  वाचण्याचा सराव करावा. एकदा ,दोनदा, तीनदा तीच तीच पुस्तके वाचा.
·       दररोज पाच ओळी शुद्धलेखन करणे –
इंग्रजी लेखन करताना एक शब्द जरी लिहायचा झाला तरी तो शब्द एकदा वाचून लिहिण्याऐवजी दोन तीन वेळा पाहून लिहावे लागते. सुरुवातीला प्रत्येक शब्द फक्त एकदा वाचून लिहिण्याचा सराव करा. त्यानंतर एक वाक्य दोन तीन भागात  विभागून लिहिण्याचा सराव करावा. यासाठी आजपासूनच दररोज पाच ओळी सुंदर हस्ताक्षरात अचूक आणि बिनचूक खाडाखोड न करता  लिहिण्यास सुरुवात करा.
·       दैनदिनी लिहा –
दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घटना , केलेली चांगली कामे , हातून घडलेल्या चुकीच्या गोष्टी, भेटलेल्या महत्वाच्या व्यक्ति , आपण दिवसभरात काय काय केले या सर्व गोष्टीची नोंद आपण दैनदिनीमध्ये करावी पण ती मातृभाषेतून लिहिण्याऐवजी इंग्रजीतून लिहावी.
·       स्वताचा शब्दकोश तयार करा-
आपला स्वताचा शब्दकोश तयार करा. तो शब्दकोश करताना आणि वाचताना गोडी वाटली पाहिजे. विषयाची आवड वाढीस लागली पाहिजे. आपला शब्दसंग्रह वाढला पाहिजे. यासाठी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द ,नाम,सर्वनाम,क्रियापदे, विशेषणे ,क्रियाविशेषणे इ.शब्दांची यादी करावी.
·       मराठी आणि  इंग्रजी वर्तमानपत्राचे वाचन-
प्रथम मराठी वर्तमानपत्रातील बातम्या वाचाव्या. त्याच बातम्या इंग्रजी वर्तमानपत्रातील वाचाव्या. एकच बातमी मराठी आणि इंग्रजीतून वाचायची सवय लावा. त्यामुळे इंग्रजीमध्ये नेमकी बातमी काय आहे याचा बोध होईल. प्रत्येक इंग्रजी शब्दाचा शब्दांचा अर्थ समजण्यासाठी पुन्हा पुन्हा शब्दकोशाचा  वापर करावा लागणार नाही. एखाद्या शब्दाचा अर्थ जरी समजला नाही तरी संदर्भाने अर्थ समजू लागतील.सुरुवातीला इंग्रजी वर्तमानपत्र वाचणे अवघड वाटेल पण कालांतराने सवय होईल. सातत्य महत्वाचे आहे. वतर्मानपत्र वाचन करताना बातम्यांचे वर्गीकरण करा. जसे अपघात ,पूर , शैक्षणिक , शेतीविषयक , खेळासंबंधी ,आर्थिक , चित्रपट इ.अशा वर्गीकृत बातम्यांचे संकलन करून त्यातील शब्दांची यादी करावी.बातम्यांमध्ये हे शब्द वारंवार वापरले त्यामुळे पुन्हा बातमी वाचताना सहज समजते.
·       इंग्रजीतून गोष्टीची , विनोदाची पुस्तके वाचणे-
आवडणाऱ्या विषयावरील छोट्या छोट्या गोष्टीची , विनोदाची चित्रयुक्त इंग्रजी पुस्तके वाचावीत. आपण वाचलेल्या गोष्टी किंवा विनोद इतरांना सांगा.
·       इंग्रजी चित्रपट आणि कार्टून फिल्म्स पाहणे-
नेहमीच अभ्यास म्हटल्यावर मुलांना कंटाळा येतो.अशावेळी  सबटायटल्स सहीत लागणारे इंग्रजी चित्रपट पाहावेत. इंग्रजी कार्टून फिल्म्स पहाव्यात. इंग्रजी मालिका पहाव्यात. पाहताना प्रत्येक शब्दाच्या उच्चारावर लक्ष ठेवावे. काही इंग्रजी वाक्ये सतत कानावर पडल्याने ती वाक्ये पाठच होतात. अशी वाक्ये आपण सहज बोलू लागतो. म्हणजेच  इंग्रजी उच्चार कानावर पडून सवय होते आणि पुढे समजायला आणि उच्चारायला सोपे जाते.
·       दूरदर्शनवर इंग्रजी बातम्या पाहणे-
अध्ययन प्रक्रियेत दृक-श्राव्य साधनांना अनन्य साधारण महत्व आहे. दूरदर्शन हे एक प्रभावी दृक-श्राव्य साधन म्हणून समजले जाते.या साधनाचा उपयोग करून इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न करू शकतो. दूरदर्शनवर प्रथम मराठी त्यानंतर  हिंदी भाषेतून प्रसारित होणाऱ्या बातम्या पहा आणि ऐका. त्यानंतर इंग्रजी भाषेतून प्रसारित होणाऱ्या बातम्या पहा आणि ऐका. एकच बातमी हिंदी  आणि इंग्रजीतून पाहण्याची आणि ऐकण्याची सवय लावा.
·       इंग्रजी – इंग्रजी - मराठी  शब्दकोशाचा वापर-
इंग्रजीचा एखादा नवीन शब्द समोर आला की आपण लगेच शब्दकोशात शोधतो. असे अपरिचित शब्दांचे अर्थ पाहण्यासाठी सर्वप्रथम इंग्रजी - इंग्रजी - मराठी  असा शब्दकोश वापरण्यास सुरुवात करावी. त्या शब्दाला दुसरा इंग्रजी समानार्थी शब्द समजतो. जो शब्द शोधला आहे त्या शब्दाखाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचण्याची सवय लावा. अशा शोधलेल्या शब्दांची स्वतंत्र यादी करावी.ते शब्द वारंवार वाचावेत.
·       मराठी-इंग्रजी शब्दकोशाचा वापर-
इंग्रजी लेखन आणि संभाषण करताना अनेकदा आपल्याला मराठी शब्दांना कोणता इंग्रजी शब्द आहे हे कळत नाही किंवा आठवत नाही. अशावेळी आपण मराठी-इंग्रजी शब्दकोशाचा वापर करून त्या मराठी शब्दाला नेमका कोणता इंग्रजी शब्द आहे ते शोधू शकतो. म्हणजेच मराठी-इंग्रजी शब्दकोश अत्यंत उपयुक्त ठरतो.
·       ONLINE शब्दकोश वापरा-
छापील शब्दकोश भलामोठा असतो. नेहमी तो आपण सर्वत्र सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आजच्या स्मार्ट युगात प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहेत. Playstore वर अनेक मोफत शब्दकोश उपलब्ध आहेत त्या ONLINE शब्दकोशाची मदत घेऊ शकतो. ONLINE शब्दकोश वापरण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्या शब्दाचा नेमका उच्चार कसा करावा हे ऐकता येते. त्याच पद्धतीने उच्चार करण्याचा सराव करावा व योग्य उच्चार शिकावा.
·       इंग्रजी बोलायला सुरुवात करा-
वारंवार बोलली जाणारी छोटी छोटी इंग्रजी वाक्ये पाठ करा आणि ती वाक्ये प्रसंगानुसार बोलताना वापरायला सुरुवात करा. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल व दुसऱ्यावर चांगली छाप पडेल. इंग्रजीतून वारंवार विचारले जाणारे किंवा विचारावे लागणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाठ करा. प्रश्न इंग्रजीतून विचारण्यास सुरुवात करा.
·       इंग्रजीतून प्रसंग कथन-
आपल्या आजूबाजूला अनेक घटना किंवा प्रसंग घडत असतात.आपण पाहिलेल्या घटना किंवा प्रसंग दुसऱ्याला म्हणजेच आपल्या मित्रांना किंवा पालकांना सांगण्याची सवय आपली असते.  या सगळ्या गोष्टी इंग्रजी भाषेतून सांगण्याचा प्रयत्न करावा. अचूक इंग्रजीत सांगता आले नाही तरी मोडक्या-तोडक्या इंग्रजीत कथन करा. सांगताना अनेकवेळी इंग्रजी शब्द आठवणार नाहीत, तर त्याची चिंता करू नका. ते शब्द मराठी-इंग्रजी शब्दकोशात शोधून आपला शब्दसंग्रह वाढण्यास मदतच होणार आहे.
·       इंग्रजीतून विचार करा-
बोलताना आपण काय बोलयाचे त्या वाक्याचा प्रथम मनात  विचार करतो आणि नंतर ते वाक्य बोलतो . म्हणजेच जसा विचार करतो,ज्या भाषेत विचार करतो त्याच भाषेत आपण बोलतो. इंग्रजी शिकण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा इंग्रजीतून विचार करण्याचा सराव करा.म्हणजे इंग्रजी बोलताना अडखळणार नाही. सुरुवातीला हे करणे कठीण जेल पण सरावे शक्य होईल.फक्त सातत्याने प्रयत्न करा.
·       परदेशातील शाळांमधल्या मुलांसोबत गप्पा-
आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण जग खूप जवळ आले आहे. आपण फेसबुक, ट्वीटर मार्फत अनेक आंतरराष्ट्रीय समूहांचा भाग होऊ शकतो, अनेकांशी मैत्री करू शकतो. स्काईप, व्हिडीओ कॉल , संदेश पाठवून परदेशातील शाळांमधल्या मुलांसोबत, इतर व्यक्ती सोबत  गप्पा मारण्यासाठी  इंटरनेटचा उपयोग करावा.
·       इंग्रजी माध्यमातील मुलांशी मैत्री करणे –
आपले अनेक मित्र असतात. या मित्रांचा उपयोग इंग्रजी सुधारण्यासाठी करता येतो. यासाठी इंग्रजी माध्यमातील  मुलांशी मैत्री करावी. त्यांच्याशी इंग्रजीत गप्पागोष्टी करून आपला इंग्रजी बोलण्याचा सराव होऊ शकतो. इंग्रजी बोलताना वाटणारी भीती कमी होऊ शकते.
·       इंग्रजी AUDIO पुस्तके ऐका-
लहान मुले बोली भाषा ऐकून ऐकुन आणि बोलून बोलून शाळेत जाण्यापूर्वीच  बर्‍यापैकी शिकतात. इंग्रजी बोलता येण्यासाठी आधी जास्तीजास्त ऐकावे लागते. आपण जे ऐकतो तेच बोलतो. आपण आपली मातृभाषा शाळेत ज्याण्यापूर्वी बोलयला शिकलो कारण घरात आजूबाजूला ती भाषा ऐकून -ऐकून बोलयला शिकलो. आज अनेक इंग्रजी AUDIO पुस्तके उपलब्ध आहेत. ती जास्तीतजास्त ऐका म्हणजे आपोआप बोलायला शिकाल.
·       GOOGLE TRANSLATER चा वापर करा-
एखाद्या भाषेतील मजकूर आपल्याला हव्या असणाऱ्या भाषेत भाषांतर करण्यासाठी आपण GOOGLE TRANSLATER या AAP चा वापर करतो.बऱ्याच वेळेला आपल्याला इंग्रजीचे आपल्या मातृभाषेत भाषांतर करावे लागते.  इंग्रजीचे इतर भाषेत भाषांतर करताना GOOGLE TRANSLATER या AAP चा वापर करावा.
·       YOUTUBE वरचे व्हिडिओ पहा-
YOUTUBE हा शब्द आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो. खरच आज  youtube हे निर्विवादपणे आधुनिक युगातील  महागुरू असल्याचे सिद्ध झाले आहे. YOUTUBE च्या योग्य वापराने पूर्वी कधीही नव्हंत  इतक अध्ययन-अध्यापन प्रभावी, रंजक, आनंददायी  आणि परिणामकारक झाले आहे. इंग्रजी शिकण्यासाठी असंख्य व्हिडीओज मोफत उपलब्धआहेत .ते व्हिडीओ पाहून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो.
·       इंग्रजी क्लब स्थापन करा –
इंग्रजी बोलण्याच्या सरावाकरता, हौशी आणि इंग्रजी शिकण्याची इच्छा असणाऱ्या मित्रांना एकत्र करून इंग्रजी क्लब स्थापन करावा.दररोज भेटण्याची ठराविक वेळ ठरवावी. सर्वांनी एकत्र येऊन फक्त आणि फक्त इंग्रजीतून गप्पा कराव्यात. अभ्यासक्रमातील घाकावर इंग्रजीतून चर्चा करावी.
·       इंग्रजी शब्दांची अंताक्षरी खेळा-
आपण हिंदी मराठी गाण्यांची, गावाच्या नावांची किंवा चित्रपटांच्या नावांची अंताक्षरी खेळत असतो. अंताक्षरी खेळणे प्रत्येकाच्या आवडीचा खेळ आहे. याच आवडीच्या खेळाचा उपयोग आपण इंग्रजी शब्दांची अंताक्षरी खेळून शब्दसंग्रह वाढविण्यासाठी करू शकतो. मित्रासोबत इंग्रजी शब्दांची अंताक्षरी खेळ खेळा.
·       शैक्षणिक AAP चा वापर करा-
आज playstore वर इंग्रजी शिकण्यासाठी असंख्य appsउपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा.उदा. Hello English / Learn Daily English / Learn English With Duolingo / Learn English Quickly / Learn To Speak English / Learn English With Aco / Learn English Audio / Learn English With Videos / Speak English Fluently इ.
·       पुस्तकातील कविता तालासुरात म्हणा-
आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता पाठ करा. प्रत्येक कवितेला वेगवेगळ्या मराठी हिंदी गाण्यांच्या चाली लावा. कविता तालासुरात म्हणा.
·       इंग्रजी भाषणे ऐका –
जास्त इंग्रजी ऐकल्याने इंग्रजी सुधारते म्हणून इंग्रजी भाषेतून केली जाणारी  भाषणे ऐका. Youtube वर अनेक इंग्रजी भाषेत केलेल्या भाषणाचे व्हिडीओ आहेत. ते ऐका , ऐकताना भाषण करतानाचे हातवारे , बोलण्याची शैली , चढ-उतार , याकडे लक्ष द्या. प्रत्येक वाक्याचा अत्र्ह समजावून घेण्याचा प्रयत्न करा. आपण हि अशीच भाषणे करण्याचा प्रयत्न करा.
·       इंग्रजी शब्दकोडी सोडवा-
आपला शब्दसंग्रह वाढविण्यासाठी शब्दकोडी सोडविणे अत्यंत उपयुक्त ठरतात. वर्तमानपत्रात दिली जाणारी शब्दकोडी सोडवा. शब्द कोड्यांची स्वतंत्र पुस्तके सुद्धा मिळतात. आपली तर्कसंगत विचार करण्याची क्षमता , संदर्भाने अर्थ समजण्याची क्षमता विकसित होते.  
·       इंग्रजी म्हणी लक्षात ठेवा-
इंग्रजी भाषेतील म्हणीची यादी करा. त्या म्हणी वारंवार वाचा. आपले बोलणे आणि लेखन प्रभावी , परिणामकारक आणि अलंकारिक करण्यासाठी  त्या इंग्रजी म्हणी पाठच करा. त्यांचा वारंवार वापर आपल्या बोलण्यात आणि लेखनात करण्याचा सराव करा.
·       इंग्रजी सुविचार लक्षात ठेवा-
आपले बोलणे आणि लेखन प्रभावी , परिणामकारक करण्यासाठी  इंग्रजी सुविचार वापरा. अनेक थोर , महान लोकांचे विचार पाठ करा.  अशा सुविचारांची यादी करा , ती यादी वारंवार वाचा.त्यांचा वारंवार वापर प्रसंगानुसार आपल्या बोलण्यात आणि लेखनात करण्याचा सराव करा.
·       भाषण इंग्रजीतून करा-
सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अनेक सहशालेय उपक्रम किंवा स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा म्हणजेच भाषण स्पर्धा असते. अशा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन इंग्रजी भाषेत भाषण करा. भाषण लिहून पाठच करा. म्हणजे सर्वांसमोर बोलताना आत्मविश्वास वाढेल. चार-चौघात बोलण्याचे धाडस वाढेल. आपले व्यक्तिमत्व सुधारेल.
·       इंग्रजीतून संदेश पाठवा-
वाढदिवस, सण, परीक्षा , अभिनंदन अशा अनेक प्रसंगी आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकाना  शुभेच्छा देतो.पूर्वी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या जायच्या. पण आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात, स्मार्ट फोनच्या काळात मोबाईलवरून संदेश पाठवितो.असे संदेश टाईप करताना संकेत न वापरता पूर्ण वाक्यात  शुभेच्छा इंग्रजीतून टाईप करून पाठविण्याची  सवय करा.
·       परदेशी लोकांशी गप्पा मारा-
फेसबुकवर परदेशी लोकांशी मैत्री करा. त्यांच्याशी गप्पा मारा पण त्या इंग्रजीतून.अनेक विषयावर त्यांच्याशी चर्चा करा. Whatsapp वरून त्यांच्याशी इंग्रजीतून chatting करा. Chatting करताना मर्यादा पाळा.कोणताही अतिरेक करू नका.
·       इंग्रजीतून पत्र पाठवा-
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पोस्टाने पत्र पाठविणे हि गोष्ट कालबाह्य होत चालली आहे. आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकाना पोस्ट कार्ड लिहून पाठवा. ही पत्रे इंग्रजी भाषेत लिहा.
·       इंग्रजी हस्ताक्षर सुधारा-
सुंदर हस्ताक्षर हे आपल्या व्यक्तिमत्वाचा सुरेख दागिना आहे. सुंदर हस्ताक्षराचे नेहमीच कौतुक केले जाते. थोड्या प्रयत्नांनी आपण आपले अक्षर सुधारू शकतो. सुंदर हस्ताक्षरात लिहिलेले नेहमीच आनंदाने वाचले जाते. Cursive writing शिका. थोड्या सरावाने ते सहज शिकता येते. इंग्रजी लिहिताना Cursive writing मध्ये लिहा.  त्याने चांगली छाप पडेल.
·       चित्र वर्णन इंग्रजीत करा –
चित्रे पाहून  त्याचे इंग्रजीतून वर्णन करण्याचा  प्रयत्न करा. इंग्रजीतून चित्रावरून गोष्ट लिहिण्याचा सराव करा. यामुळे आपली कल्पनाशक्ती वाढेल.
·       इंग्रजीतून शुभेच्छा द्या -
वाढदिवसाच्या शुभेच्छा ,शुभप्रभात, होळीच्या शुभेच्छा-----इ. अशा अनेक शुभेच्छा आपण देतो. अशा शुभेच्छा देताना मराठी ऐवजी इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करा.
·       स्वताचा आवाज रेकॉर्ड करा –
आज प्रत्येक घरात  स्मार्ट फोन  आहेत. या स्मार्ट फोनचा उपयोग आपण आपल्या अभ्यासासाठी करावा. इंग्रजी मोठ्याने वाचा. आपण जे वाचतो ते मोबईल मध्ये रेकॉर्ड करा.ते रेकॉर्ड पुन्हा ऐका . प्रत्येक शब्दाचा उच्चार बरोबर केला का ते तपासा. तो उच्चार योग्य करण्याचा सराव करा.
·       इंग्रजी नाटक बसवा –
छोटी-छोटी इंग्रजी नाटके बसवा. त्यात भाग घ्या. सवांद पाठ करा. अभिनय शिका.त्यातून आपले व्यक्तिमत्व सुधारते,आत्मविश्वास वाढीस लागतो.
·       इंग्रजीतून शिक्षकांशी बोला-
शाळेत आपल्याला शिकविणाऱ्या शिक्षकांशी इंग्रजीतून बोलण्यास सुरुवात करा. त्यांनाही याचा खूप आनंदच होईल. खास करून इंग्रजी शिक्षकांशी इंगाजीतूनच बोला. बोलताना आपल्या काही चुका होत असतील तर त्या शिक्षक आपल्या निदर्शनास आणून देतील. बरोबर कसे बोलावे यासंबधी त्यांचे मार्गदर्शन घ्या.
मुळात इंग्रजी ही भाषा खूप सोपी आहे, आपण ती शिकू शकतो हा आत्मविश्वास ज्या  व्यक्तीमध्ये निर्माण झाला तीच व्यक्ती  इंग्रजी शिकू शकते. ऱ्हस्व, दीर्घ, वेलांट्या, मात्रा, शब्दांचा पाय मोडावा का नाही, अक्षराचे पोट फोडणे यातले काहीही मराठीसारखे इंग्रजीत नाही.इंग्रजीत फक्त २६ मुळाक्षरे आहेत तर मराठीत ४८ मुळाक्षरे आहेत.म्हणूनच  इंग्रजी भाषा मराठीपेक्षा सोपी आहे.  इंग्रजी भाषा बोली भाषा म्हणून वापरण्यासाठी जीभेला वळण लावण्याचा निर्धार करा. इंग्रजी भाषा दुस-यावर छाप पाडणारी सोपी भाषा आहे. कुठल्याही टेन्शनशिवाय उत्तम भाषा वापरण्यासाठी थोड्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. तुम्ही इंग्रजी माध्यमातून शिकला तरीही इंग्रजीचा जोपर्यंत सराव करणार नाही तोपर्यंत ती भाषा तुम्हाला आत्मसात होणार नाही. त्यामुळे जास्तीतजास्त इंग्रजी श्रवण, सवांद, लेखन आणि वाचन करून आपण आपले इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न करा.

Thursday, 5 October 2017

दि 3 व 4 ऑक्टोबर 2017 रोजी R M S A अंतर्गत माध्यमिक शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण 2017-18 सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास CPD राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक कार्यशाळा महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे येथे आयोजित करण्यात आली होतीे . सदर कार्य शाळेस पालघर, नांदेड, भंडारा, वर्धा ,अकोला ,सांगली ,कोल्हापूर जळगाव धुळे  अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी एक सहा शिक्षक व एक मुख्याध्यापक असे एकूण 160 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे यशस्वी आणि उत्कृष्ट  नियोजन  आदरणीय सौ. पल्लवी देव मॅडम (विद्या प्राधिकरण तज्ञ पुणे) यांनी केले. आदरणीय सौ.शीतल बापट मॅडम ( पाठय पुस्तक निर्मिती मंडळ सदस्य) आदरणीय सौ. शिरीष साठे मॅडम यांनी अनमोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मा. श्री.के पी. पाटील (उपसंचालक) आणि मा. श्री रामदास वालझाडे (मूल्यमापन अधिकारी) यांनी उपस्थित राहून प्रोत्साहन दिले शेवटी प्रशिक्षण समारोप करण्याची जबाबदारी सौ.पल्लवी मॅडम यांनी माझ्यावर सोपवली होती .धन्यवाद मॅडम.
राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण खूपच उपयुक्त वाटले. आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला .
आदरणीय पल्लवी मॅडम , व टीम, सर्व मार्गदर्शक, अधिकारी याचे मनापासून आभार
लेखन-
बी.आर. चव्हाण, डहाणू
जि. पालघर.




Sunday, 24 September 2017

आज दिनांक २२/९/२०१७ रोजी डहाणू , पालघर येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार  २०१७ च्या निमित्त  माझ्या ENGLISH गुरू या ब्लॉग चे उदघाटन
आदिवासी विकास मंत्री व पालघर जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.विष्णुजी सवरा, साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमास
श्री. विजय खरपडे (अध्यक्ष,जिल्हा परिषद पालघर)
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
मा. खा.ऍड.श्री. चिंतामण वनगा साहेब (लोकसभा सदस्य),
मा. श्री.पास्कल धनारे साहेब विधानसभा सदस्य , मा.श्री.निलेश गंधे (उपाध्यक्ष ,पालघर जिल्हा परिषद),
मा.श्रीमती.धनश्री चौधरी ,(सभापती, महिला व बालकल्याण समिती )
मा.श्रीमती.दर्शना दुमाडा, (सभापती,समाज कल्याण समिती)
तसेच, पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मा.श्री.एम.एन. बोरीकर साहेब
पालघर जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.)
मा.श्री.राजेश कंकाळ साहेब आणि
 शिक्षणाधिकारी (प्राथ)
मा.श्रीमती.संगीता भागवत मॅडम
आणि सर्व सत्कारमूर्ती आदर्श शिक्षक व इतर सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते. या नवनिर्मिती साठी माझा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अभिनंदन केले.




Saturday, 16 September 2017

इंग्रजी अभ्यास मंडळाच्या सदस्यांशी डहाणूतील शिक्षकांचा थेट संवाद
प्रथमच डहाणूत प्रयोग
       शनिवार दि.16 सप्टेंबर 2017 रोजी पंचायत समिती, डहाणू आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था पालघर  यांच्या संयुक्त विद्यमाने डहाणू येथे पुनरर्चित अभ्यासक्रम इ. 9 वी च्या इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले. तज्ञ मार्गदर्शक म्हणून मी डहाणू तालुक्यातील इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले . राज्य तंत्रस्नेही आनंद अनेमवाड यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाने मी स्वतः परिश्रम करून अभ्यासक्रमाबाबत अनेक PDF, PPT, व्हिडीओ तयार केले आहेत . मी तयार केलेले व्हिडीओ YOUTUBE च्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहोचविले आहेत. मी तयार केलेले सर्व साहित्य whatsapp वरून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचा सर्व शिक्षकांना फायदा होत आहे. प्रशिक्षणादरम्यान मी इंग्रजी विषय अभ्यास मंडळाचे सदस्य श्री.अशोक गायकवाड, श्री.अनिल पेटकर, श्री.अखिल भोसले, श्री.बाळकृष्ण शिंदे आणि श्री.साहेबराव महाजन यांना whatsapp वरून व्हिडीओ कॉल करून शिक्षकांना प्रत्यक्ष त्यांना भेटण्याची आणि त्यांच्या मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षकांच्या शंकांचे निरसन प्रत्यक्ष अभ्यास मंडळाच्या सदस्यांकडून करून देण्याचा व्हिडीओ कॉल प्रयोग महाराष्ट्रात प्रथम डहाणूत केल्याचा आनंद शिक्षकांनी व्यक्त केला. असेच प्रयोग सर्वत्र व्हावेत अशी माझी इच्छा आहे.
                                     श्री.बी.आर.चव्हाण.